वर्धा (वृत्तसंस्था) हिंगणघाट शहरातील दोन मित्र एकाच दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने या दुचाकीस्वारांना चिरडले. हा अपघात कलोडे चौकामध्ये गुरुवारी रात्री साडेनऊ वाजतादरम्यान झाला. दुर्गेश राजेश ढगे (१६) व आदित्य अनिल वाघ (१६, दोघेही रा. मारोती वॉर्ड) अशी मृतांची नावे आहेत.
दुर्गेश आणि आदित्य कलोडे चौकातून दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग ओलांडत होते. तेवढ्यात या महामार्गाने हैदराबाद येथून नागपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या (आर.जे.११, जी.बी. ५८११) क्रमांकाच्या ट्रकने जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. दुचाकी ट्रकच्या आतमध्ये घुसून दुर्गेश ढगे याचा जागीच मृत्यू झाला. तर आदित्य वाघ हा गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचाराकरिता सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
अपघातात मृत पावलेला आकाश आणि दुर्गेश हे दोघेही महेश ज्ञानपीठचे विद्यार्थी होते. या दोघांनीही नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यामुळे ते आपल्या मित्रांसोबत दुचाकीने फिरायला निघाले होते. परंतु कलोडे चौकात त्यांच्यावर ट्रकच्या रुपात काळाने झडप घातली. दोघांच्याची मृत्यूने शहरामध्ये शोककळा पसरली आहे.