मुंबई (वृत्तसंस्था) शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला . यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी मोदी सरकारला दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘ईडी ज्यांचे आदेश पाळत आहेत. त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय उद्योगधंदे आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालते, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणत्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही.’
ते पुढे म्हणाले“दिल्लीश्वरांना महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर गुन्हा वाटत असेल, तर महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील.’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.