टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमधील भारताची पदकाची प्रबळ दावेदार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिची विजयी कामगिरी सुरु आहे. सिंधूनं बुधवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये हाँगकाँगच्या चीयूंग नगन यीचा २१-९, २१-१६ असा सरळ गेममध्ये पराभव केला आहे.
रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूने टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेतही आपल्या कामगिरीत सातत्य ठेवलं आहे. पी.व्ही. सिंधूने पहिला सेटमध्ये २१-९ अशा फरकाने आघाडी घेतली. १५ मिनिटं चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूनं फिरवला. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने वापसी केली. त्यामुळे पी.व्ही. सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली.
दुसऱ्या सेटमध्ये एका क्षणी दोन्ही खेळाडू १४-१४ अशा बरोबरीत होत्या. त्याचवेळी सिंधूने चांगला खेळ करत दुसऱ्या सेटमध्येही आघाडी घेतली. सिंधूने दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण ३५ मिनिटं चाललेला हा सामना सिंधूने २१-९, २१-१६ अशा फरकाने जिंकला. महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे.