मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई (Mumbai) महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली दिल्लीत झाली आहे. त्यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान केंद्र सरकारचा हा निर्णय महाविकास आघाडीसाठी (Maha Vikas Aghadi) धक्का मानला जातोय.
दरम्यान, इक्बाल सिंह चहल यांनी स्वत: ट्विट करुन आपल्या बदलीची माहिती दिली आहे. “मला हे सांगताना आनंद होत आहे की भारत सरकारने मला भारत सरकारच्या सचिव पदावर नियुक्त केले आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे”, अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.
इक्बाल सिंह चहल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांची 8 मे 2020 रोजी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी वर्णी लागली होती. त्याआधी ते नगरविकास विभागात प्रधान सचिव होते. चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती. ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिवही होते. तसेच औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे.
















