चोपडा प्रतिनिधी । येथील बोरअजंटी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असून बिबट्याने हैदोस घातल्यामुळे शेतकर्यांमध्ये दहशत पसरली आहे. शनिवारी रात्री डॉ. नरेंद्र मगनलाल शिरसाट यांच्या शेतात बिबट्याने वासराची शिकार केली.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरअजंटी शिवारात डॉ. नरेंद्र मगनलाल शिरसाट यांचे शेत आहे व त्यांच्या शेतात रखवालदार आनंदा हजाऱ्या बारेला व रायबर मालसिंग बारेला हे राहत असतात तेथे त्याच्या निवारा सोबत गायी व वासरू देखील असतात. रात्री 9 वाजेच्या सुमारास अचानक गायीच्या हंबरडा सुरू झाला. त्यांनी इकडे तिकडे आपल्या निवारातून पाहिले असता तर सगळीकडे अंधार दिसत असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष करत झोपी गेले. सकाळी उठल्यावर ते गोठ्यात गेले असतात त्यांना एक वासरु नसल्याचे लक्षात आले. वासरूचा शोध घेतल्यावर शेतातच काही अंतरावर वासरू मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी बिबटाच्या पावलांचे ठसे ही निदर्शनास आले, पावलांच्या ठशांवरून तो प्राणी बिबटा असल्याचा अंदाज आहे. मागील आठवडाभरापासून पावसाची संततधार सुरू असून त्यात शिवारात वीज गायब असते आणि हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वन विभागाने त्वरित लक्ष घालून बिबटाच्या बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.
सदर बिबटाचा शिकार झालेल्या वासराचा पंचनामा बोरअजंटी परिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक यांनी घटनास्थळी जावून रितसर पंचनामा केला असून पावलांच्या ठश्यावरून सदर प्राणी बिबटा आहे, असा निष्कर्ष काढला आहे तरी शेतकरी व रहिवासींनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे.