नाशिक (प्रतिनिधी) तलाठी दप्तर तपासणीमुळे महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येऊन महसूल विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख होण्यास मदत होणार असून प्रलंबित कामांचा निपटाराही होण्यास मदत होणार आहे, असे मत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले.
नाशिक महसूल विभागातील पाचही जिल्हयातील तलाठी दप्तरांची सखोल तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्वाचा कणा असून जमीनी विषयक सर्व प्रकारची कागदपत्रे सांभाळणारे व अद्ययावत करण्याची जबाबदारी असलेल्या तलाठी कार्यालयाशी सर्व सामान्य जनतेचा नेहमी संबंध येतो. तलाठी दप्तरामध्ये सामान्य शेतक-यांचे ७/१२ उतारा, फेरफार यासह सरकारी जमीन इनाम व वतन जमीनी यांच्या नोंदी यासारखे अनेक अभिलेखे असतात. तलाठी दप्तराची वेळेवर तपासणी होऊन त्यामधील त्रुटींवर वेळेत कार्यवाही झाली तर गावपातळीवरील अनेक प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे वाद-विवाद व कनिष्ठ न्यायालयातील दावे कमी होतील, अशी आशा गमे यांनी व्यक्त केली.
विभागातील एकूण २ हजार ०६३ तलाठी कार्यालयांची होणार दप्तर तपासणी
नाशिक विभागातील पाच जिल्हयात एकूण २०६३ तलाठी कार्यालये आहेत. नंदुरबार जिल्हयात २२२, धुळे २२५, जळगाव ५०१, नाशिक ५३२ तर अहमदनगर जिल्हयात ५८३ तलाठी आहेत. या सर्व तलाठी कार्यालयांच्या दप्तराची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून पुढील तीन महिन्यात ही कार्यवाही पूर्ण केली जाईल.
तलाठी दप्तरांची तपासणी करण्याचे सविस्तर आदेश विभागीय आयुक्तांनी नुकतेच जारी केले असून सखोल दप्तर तपासणी कशा पध्दतीने करावयाची याबाबत महसूल अधिका-यांची कार्यशाळाही नुकतीच घेण्यात आली. तलाठी दप्तर तपासणीमध्ये पीक पाहणी, ७/१२ संगणकीकरण यासारख्या बाबींचीही छानणी केली जाईल. दप्तर तपासणीमध्ये विविध गाव नमुने, प्रलंबित फेरफार, सरकारी, वतन व इनाम जमिनींची नोंद यासह अनेक बाबींची तपासणी करण्यात येणार आहे.
तलाठी दप्तर तपासणीमुळे जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न सुटण्यास मदत होणार
नाशिक विभागातील पाचही जिल्हयातील सर्व प्रांत अधिकारी व तहसिलदार यांच्यासह जिल्हयातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तलाठी दप्तराची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये आढळणा-या त्रुटींची तातडीने पूर्तता करुन सरकारी अभिलेखे अद्ययावत करण्याची कार्यवाही केली जाईल. तलाठी दप्तर तपासणीमुळे सामान्य शेतकरी व नागरिकांच्या जमीनी विषयक तक्रारी व प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. कुठल्याही सबळ कारणाशिवाय फेरफार आणि जमीन विषयक कामे प्रलंबित राहू नयेत, याकडे या तपासणीमध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दप्तर तपासणीच्या कामासाठी एक ॲप तयार करण्यात येणार असून त्याव्दारे या कामाचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.