धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे भूषण, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील जनप्रिय, विद्यार्थीप्रिय व शिक्षकप्रिय म्हणून सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या शरदकुमार बन्सी सरांचे दिनांक २६ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.धरणगावच्या दृष्टीने हृदय हेलावून टाकणारी ही घटना आहे.
दिलदार मनाच्या या आनंदयात्रीला आज ते सेवा करीत असलेल्या पी. आर. हायस्कूल मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक प्रा. बी.एन.चौधरी यांनी बन्सी सरांच्या दिलदार स्वभावाचे कंगोरे उलगडून दाखवले. गेले २८ दिवस त्यांनी कोरोनाला हरविण्यासाठी जो संघर्ष केला, त्याचे वर्णन केले. उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी बन्सीसरांविषयीच्या आठवणी जाग्या केल्या तर ज्येष्ठ शिक्षक बापू शिरसाठ, संजय बेलदार आणि मुख्याध्यापक संजय अमृतकर यांनी बन्सीसरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.या वेळी पी. आर. हायस्कूलचे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आपल्या जवळच्या सहकारी मित्राला असा अकाली मृत्यू यावा, या आठवणीने शिक्षकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.