कोल्हापूर (वृत्तसंस्था) पाच वर्षाच्या मुलाच्या आजाराच्या खर्चाला कंटाळून जन्मदात्या बापाने त्याला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील कबनूर गावात हा प्रकार घडला. अफान सिकंदर मुल्ला असे पाच वर्षीय मुलाचे नाव आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर हुसेन मुल्ला (वय ४८) मुल्ला हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या परिवारासोबत कबनूर येथे राहतात. त्यांना पाच वर्षाचा अफान नावाचा मुलगा आहे. मात्र, लहान असल्यापासून त्याला एका आजाराने वेढल्याने मुल्ला कुटुंबीय सतत आर्थिक संकटात होते. या खर्चाला कंटाळून सिकंदर मुल्ला यांनी दोन महिन्यांपूर्वी घर सोडून पलायन केले. त्यांच्या पत्नी आणि मेव्हण्याने त्यांचा शोध घेतला. त्यावेळी मुलाला सोडून न जाण्याचा दम दिला. मुलाच्या आजारामुळे मुंबईला होणाऱ्या वारंवार फेर्या आणि खर्च यामुळे कंटाळलेल्या सिकंदर मुल्ला यांनी गुरूवारी रात्री सायकलवरून पंचगंगा नदीत मोठ्या पुलावरून पाच वर्षाच्या मुलाला थेट फेकून दिले. त्यानंतर स्वतः घरी येऊन नातेवाईकांना मुलाला फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, यावर कोणाचा विश्वास बसला नाही. मुलगा बेपत्ता असल्याची खात्री पटल्याने नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली त्यानुसार वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे सिकंदर मुल्ला यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार यांना अटक करण्यात आली आहे.