भुसावळ (प्रतिनिधी) दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकू व पिस्तूल लावून ‘तुम्हारे पास जो है वो निकाल के दो’, असे म्हणत व्यापाऱ्याला लुटल्याची घटना भुसावळात बुधवारी रात्री घडली. धक्कादायक म्हणजे व्यापाऱ्याजवळील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पोबारा केला.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील आठवडे बाजारातील अप्सरा चौकातील गणेश ट्रेडर्सचे मालक मोहन चावराई हे बुधवारी रात्री १०.३० नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. याचवेळी पल्सर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना पाठीमागून चाकू व पिस्तूल लावून ‘तुम्हारे पास जो है वो निकाल के दो’ अशी धमकी दिली. नंतर चावराई यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांसोबत चावराई यांची झटापट झाली. त्यामुळे चोरट्यांच्या हाती पिशवी लागली नाही. त्यामुळे चोरट्यांनी गळ्यातील हाती लागलेली अर्धीच सोन साखळी घेऊन पळ काढला. पोलिसांनी घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.