मुंबई (वृत्तसंस्था) विलेपार्ले येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर रसायनशास्त्रचा (केमिस्ट्री) पेपर फुटल्याची घटना घडली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीय. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटला नसल्याचे सभागृहात स्पष्टीकरण दिले.
बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर हा मोबाइल ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा भाग आढळणे ही गंभीर बाब असून भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाला अटक
मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली आहे. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे.
















