जळगाव (प्रतिनिधी) येथील सुप्रीम कॉलनीतील मोबाईलचे दुकान फोडून तीन मोबाईलसह रोकड आणि मोबाईलच्या वस्तू चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सुभाष सुरेशचंद जैन (वय ३८ रा. सुप्रिम कॉलनी) हे कुटुंबियांसह राहतात. ते मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी जळगाव औरंगाबाद महामार्गावरील आर. एल. चौफुलीवर पार्टीशन पत्र्याचे मोबाईल दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे बंद दुकान फोडून दुकानातील तीन मोबाईल, २ हजाराची रोकड आणि मोबाईल असेसरीज असा एकुण ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी सुभाष जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुन्ह्यातील तपास लावण्याचे निर्देश दिले. या गुन्ह्यातील एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी शुभम उर्फ बांडु शिवरात मिस्तरी (वय-२०) रा. वाल्मिक मंदीराजवळ जैनाबाद आणि राहूल रविंद्र कोळी (वय १९) रा. जैनाबाद यांना सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली. यातील शुभमकडून दीड हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला असून चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांनी मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे.
दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींना आज न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. अटकेतील आरोपींकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या निर्देशाखाली पोलिस हे.कॉ. रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन पाटील, मुकेश पाटील आदींनी तपासात सहभाग घेतला.