अडावद ता. चोपडा (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडती या गावी गोवंशाची कत्तल करून गोमास विक्री करणाऱ्या दोघांना अडावद पोलिसांनी शिताफीने अटक करीत त्यांच्या ताब्यातून दोन लाख दहा हजार रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करीत त्यांच्याविरुद्ध प्रचलित पशु संरक्षण अधिनियमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडती ता. चोपडा या गावी बोरखेडा विष्णपूर रस्त्यावरील तलाठी कार्यालयासमोर सार्वजनिक जागी कलीम शेख सलीम (वय २५) राहणार साने गुरुजी वसाहत चोपडा आणि जावेद शेख सलीम शेख वय (४५) राहणार मोमीन मोहल्ला चोपडा हे दोघे अवैधरित्या गोवंश जनावराची कत्तल करून गोमास विक्री आणि वाहतूक करताना दि १ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आढळून आले.
अडावद पोलिसांनी घटनास्थळ गाठीत दोघा संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि त्यांच्या ताब्यातील सुमारे ५० किलो अंदाजे १० हजार रुपये किमतीचे गोमास आणि गोमास वाहतूक करणारी २ लाख रुपये किमतीची तीन चाकी रिक्षा क्रमांक एम. एच.१९ सी.एफ. ०९२६ तसेच जनावराच्या कत्तल करण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कुऱ्हाडी सुरे असा एकूण २ लाख १० हजार ८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करीत दोघा आरोपींना अटक केली.
याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनला सहकारी फिर्यादी पोलीस नाईक विनोद त्र्यंबक धनगर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. का. मधुकर पवार हे करीत आहेत. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना आज दि.२ रोजी अमळनेर येथील दिवाणी न्यायालया समोर हजर केले असता न्यायमूर्ती एल. माने यांनी आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.