सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) गावाकडे जात असलेल्या दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) व त्यांच्यासोबत अनिल चुडामन मेढे (वय ६०, दोघ रा. चिनावल, ता. रावेर) या दोघ तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना सावदा ते चिनावल दरम्यान असलेल्या कोचूर गावाजवळील स्मशानभूमीजवळ दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.
रावेर तालुक्यातील चिनावल येथील विरेंद्र नेमाडे व अनिल मेढे हे दोघे (एमएच १९, एबी. ११०१) क्रमांकाच्या दुचाकीने सावद्याकडून चिनावल येथे जात होते. याचवेळी सावदा ते चिनावल दरम्यान असलेल्या कोचूर गावाजवळील स्मशानभूमीजवळ समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या (एमएच १९, डीएम. ०३५१०) क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नेमाडे व मेढे यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडली. दरम्यान या चारचाकी वाहनातील कोणालाही दुखापत झालेले नाही, परंतु चालक हा गाडी सोडून पसार झाला आहे.
दोघांच्या मृत्यूने गावात शोककळा
अपघातात ठार झालेले विरेंद्र नेमाडे व अनिल मेढे हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहे. अपघातात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. दरम्यान, त्यांचे मृतदेह रुग्णालयात आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याप्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी मनहेलावणारा आक्रोश केला.
पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दोघांचा मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला आहे. घटनेबाबत सावदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.