भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अंमली पदार्थाचा साठा असल्याच्या संशयातून शहरातील एका तरुणाच्या घरात छापेमारी केली मात्र अंमली पदार्थाऐवजी तरुणाच्या घरात गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने तरुणाला अटक करण्यात आली. राहुल रामदास क्षिरसागर (35, फडके खानावळजवळ, अष्टभूजा हॉटेलमागे, भुसावळ) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.
शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा हॉटेल मागील रहिवासी राहुल क्षीरसागर याच्याकडे अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथक संबंधितावर नजर ठेवून होते. ठरल्यानुसार पथकाने मंगळवारी पहाटे क्षीरसागर याच्या घरावर अचानक छापा टाकून तपासणी सुरू केली. त्यात चरात ड्रग्जचा साठा आढळला नाही. मात्र, २५ हजार रुपये किमतीचे गावी पिस्तूल आणि दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस हाती लागले.
पोलिस कर्मचारी प्रशांत रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. नंतर राहुल क्षीरसागरला अटक करण्यात आली. ही कारवाई डीवायएसपी कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रशात रमेश परदेशी व सहकाऱ्यांनी केली. भल्या पहाटेच्या या कारवाईची परिसरात चांगलीच चर्चा होती.