जळगाव (प्रतिनिधी) अचानक घरामध्ये जबरदस्तीने शिरुन उद्देश मंगेश पाटील (वय २५, रा. हरिविठ्ठल नगर) व त्यांचा शालक राकेश रामदास सूर्यवंशी यांना दोन जणांनी घरात घुसून मारहाण केली. उद्देश तसेच पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना दि. ८ जुलै रोजी हरिविठ्ठल नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील हरिविठ्ठल नगरात उद्देश मंगेश पाटील हा तरुण वास्तव्यास असून तो सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम करतो. दि. ८ जुलै रोजी घरामध्ये शालकासह गप्पा करीत असताना अचानक तेथे दोन जण आले व त्यांनी दोघांना शिवीगाळ करीत मारहाण केली. एकाने धारदार शस्त्राने पाटील यांच्या कानावर व पोटावर वार केले. यात त्यांना जबर दुखापत झाली. या प्रकरणी उद्देश पाटील यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.