भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव येथील पहिलवान ढाब्याजवळील रस्त्याच्या बजूला ट्रकचे दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने जोरदार दिल्याने दुरुस्ती करणारा ट्रक चालक आणि टँकरवरील चालक या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार ११ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, वरणगाव येथील पहिलवान ढाब्याजवळ ट्रक क्रमांक (सीजी ०४ जेडी ५१७) हा नादुरुस्त झालेला होता. त्यामुळे त्या ट्रकवरील चालक नदीम नसीम खान रा. नागपूर हा ट्रक रस्त्यांच्या बाजूल करून ट्रकचे दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारे टँकर क्रमांक (एमएच ४१ एयु ४६४६) ने नादुरूस्त ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे दुरूस्ती करणारा चालक नदीम नसीम खान आणि टँकर चालक कुंभकरण रा. अमेठी राज्य उत्तर प्रदेश या दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ११ जुलै रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह वरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल सुखराम सावकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख करीत आहे.