धरणगाव (प्रतिनिधी) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने आगमन होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने बघितली असून संपूर्ण घटनाक्रम ‘द क्लिअर न्यूज’सांगितला आहे.
“शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. दरम्यान, मध्यरात्री १:२२ वाजेच्या सुमारास प्रत्यक्षदर्शी आपल्या मित्राला एरंडोल येथे घेण्यासाठी जात होता. त्यावेळी एका मोटारसायकलवर दोघं जण बॅनर फाडत होते. सुरुवातील प्रत्यक्षदर्शीला वाटले की, बॅनर लावणारे आहेत. परंतू नंतर लक्षात आले की, एका काठीला वस्तरा सारखे धारधार शस्त्र लावून उभे-उभेच बॅनर फाडण्याचे काम सुरु होते. एरंडोलहून परत आल्यावर प्रत्यक्षदर्शी व्यक्तीला काही बॅनर बांभोरी गावातही फाडलेले दिसले. याचाच अर्थ बॅनर फाडणारे एरंडोलच्या दिशेने पळून गेले आहेत. दरम्यान, अंधारामुळे प्रत्यक्षदर्शीला त्यांचा चेहरा दिसू शकला नाही.