अमळनेर (प्रतिनिधी) प्रवासी वाहनात अवैधरित्या गॅस भरणाऱ्या एकाकडून लाच मागणाऱ्या दोन पोलिसांसह एक खासगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे अमळनेर येथील धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एल.पी.जी. गॅस सिलेंडरमधून कॉम्प्रेसर मशीनच्या सहायाने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करत होते. सदरचा व्यवसाय करत असतांना अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे हे तक्रारदार व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी जावून तक्रारदार यांना ‘तुला वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करायचा असेल तर आम्हास दरमहा १५,०००/- रुपये हप्ता दयावा लागेल, नाहीतर तुझ्यावर अवैधरित्या वाहनांमध्ये गॅस भरत असल्याचा गुन्हा दाखल करतो.’ असे सांगून तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी दि.२३ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात समक्ष येऊन त्यांच्याविरूध्द तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दि.२३ रोजी पडताळणी केली असता दोन्ही पोलिसांनी तक्रारदार यांच्याकडे १५,००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२,००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले होते.
यानंतर सापळा लावला असता पोलिस अमोल पाटील व जितेंद्र निकुंभे यांनी अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये स्वराज्य पानाचे दुकानात उमेश भटु बारी (रा. अमळनेर) यांच्याकडे पैसे देण्यास सांगितले. यावेळी तक्रारदार यांच्याकडून १२,००० रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना पंटर उमेश बारी याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यावरून अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
















