नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये आज सकाळपासून सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. आज सुरक्षा जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले आहे. तर, या ठिकाणी अद्यापही चकमक सुरू आहे.
जवानांनी दहशतवादी दडून बसलेल्या परिसरास वेढा दिला असून, शोधमोहीम सुरू आहे. शोपियांमधील कुटपोरा भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, लष्कराच्या ३४ आरआर आणि सीआरपीएफच्या एका संयुक्त टीमने शोधमोहीम सुरू केली होती.
जवानांची चाहूल लागतच परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला होता. याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. या दहशतवाद्यांना अगोदर आत्मसमर्पणाची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून गोळीबार सुरूच ठेवण्यात आल्याने अखेर त्यांचा खात्मा करण्यात आला.