जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्याती शिरागड येथे देवीच्या दर्शनासाठी आलेले दोघ तरुण अंघोळीसाठी तापीनदीपात्रात उत्तरले. परंतु त्यांना खोलीचा अंदाज न आल्याने रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७ रा. रामानंद नगर) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७ रा. वाघ नगर) यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. १५ एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांच्या मदतीने दोघ तरुणांचे मृतदेह पाण्यातून चाहेर काढण्यात आले.
खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले !
जळगाव शहरातील वाघनगर परिसरात राहत असलेले रोहन व प्रथमेश हे दोघ मित्र सोमवारी दुपारच्या सुमारास यावल तालुक्यातील शिरागड येथे सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते, दर्शनापुर्वी ते अंघोळ करण्यासाठी तापी नदीच्या पात्रात उतरले. त्या दोघांना नदीपात्रातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. ही घटना मंदिराच्या परिसरात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानुसार ग्रामस्थांनी लागलीच नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली. यावेळी दोघ तरुणांचे मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून बाहेर काढले. दोघ तरुणांना तात्काळ यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आहे. प्रदीप ठाकूर मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, भरत कोळी करीत आहे.
कुटुंबियांवर दुःखाचा कोसळला डोंगर !
कौटुंबिक परिस्थिती हालाखिची असल्यानंतर देखील रोहन श्रीखंडे हा सलूनच्या दुकानावर काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. बचत केलेल्या पैशातून त्याने गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन दुचाकी खरेदी केली, आणि आज तो प्रथमेश सोनवणे या आपल्या जीवलग मित्राला घेवून शिरागडे येथे सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला गेला होता. मात्र दोघांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रोहनच्या नवीन दुचाकीचा आनंद केवळ सहा दिवसांपुरताच राहील्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडीलांच्या नकार नंतर तरुणावर काळाची झडप !
रोहन व प्रथमेश हे दुचाकीने शिरागड जाण्यासाठी निघाले असता, सुरुवातीला ते ईदगाव येथे प्रथमेशच्या घरी गेले. त्याठिकाणी त्यांनी चहा घेतला. प्रथमेश हा शिरागड येथे जात असल्याचे कळताच त्याच्या वडीलांना त्याला जाण्यास नकार दिला, मात्र त्याने वडीलांचे न ऐकता तो शिरागड येथे गेला, याठिकाणी त्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.