जळगाव (प्रतिनिधी) मामाच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने तरुणीला व्हिडिओ कॉल करून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. त्यानंतर तो व्हीडीओ नातेवाईकांना पाठवून आतेभावानेच तरुणीची बदनामी केली. तसेच तरुणीच्या दोन्ही भावांना मारुन टाकण्याची धमकी दिली. ही घटना दि. १९ डिसेंबर २०२३ ते दि. २३ मे दरम्यान घडली. या प्रकरणी शुक्रवारी तालुका पोलिस ठाण्यात भडगाव तालुक्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील एका तरुणाचे मामा जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांची २१ वर्षीय मुलगी असून तिच्यासोबत या तरुणाने काही फोटोही काढलेले आहे. या तरुणाला मामाच्या मुलीसोबत लग्न करायचे होते. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. त्यामुळे हा विरोध या तरुणाच्या जिव्हारी लागला. त्याने या तरुणीला व्हिडिओ कॉल करून तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ तसेच पूर्वी सोबत काढलेले फोटो त्याने नातेवाईकांना पाठविले व ते व्हायरल करण्याची तसेच तरुणीच्या दोन्ही भावांना मारुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरुणीने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा करीत आहेत
















