नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या एका मुलाखतीची चर्चा सुरु आहे. या मुलाखतीत अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींचं आणि त्यांच्या कार्यशैलीचं तोंडभरुन कौतुक केलं. त्याचबरोबर अशिक्षित व्यक्ती ही देशावरचं ओझं असल्याचं शाह म्हणाले.
एक अशिक्षित व्यक्ती देशावरचं ओझं असतं. कारण त्याला ना संविधानाने दिलेल्या हक्कांची माहिती असते, ना देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची. त्यामुळे अशिक्षित व्यक्ती एक चांगली नागरिक कशी होईल? असा प्रश्न शाह यांनी आपल्या मुलाखतीत उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनसेवेतील २० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त माझी मुलाखत असं लिहून त्यांनी ही मुलाखत ट्वीट केली आहे. “मोदींचं काम मी अगदी जवळून पाहिलं आहे. त्यांच्यावर हुकूमशाहीचे लावण्यात आलेले आरोप सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आहेत. ते कोणत्याही बैठकीत अगदीच मोजके बोलतात. त्यानंतर सर्वांचं ऐकून ते निर्णय घेतात.
“कधी कधी तर एवढा काय विचार करायचा? एखाद्या विषयावर एवढी चर्चा कशाला करायची असं आम्हाला वाटतं. पण मोदी सर्वांचं ऐकून घेतात. “छोट्या छोट्या विधानाचीही ते दखल घेतात आणि गुणवत्तेच्या आधारेच निर्णय घेतात. त्यामुळे मोदी निर्णय लादतात असं म्हणणं चुकीचं असून त्यात काहीच तथ्य नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.