पुणे (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शुक्रवारी घराशेजारील शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रद्धा काळू नवले (१२), सायली काळू नवले (१०), दीपक दत्ता मधे (७) आणि राधिका नितीन केदारी (१३, सर्व रा. थोरात मळा, निरगुडसर ता. आंबेगाव जि. पुणे), अशी मयत मुलांची नावे आहेत.
नेहमीप्रमाणे ज्योती नवले व त्यांचे पती काळू नवले सकाळी साडेआठच्या सुमारास घराजवळील मौजे थोरात मळा येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवण करण्यासाठी घरी आले. त्यावेळी ज्योती नवले यांची मुलगी श्रद्धा, सायली व दत्ता रामदास मधे यांचा मुलगा दीपक व संगीता नितीन केदारी यांची मुलगी राधिका असे सर्व घराच्या बाहेर आंब्याच्या झाडाखाली खेळत होते. त्यानंतर ज्योती व त्यांचे पती काळू नवले कामावर गेले. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळू नवले यांचा मुलगा सुरज याने धावत येऊन शेततळ्यात आपली बाली व इतर मुले बुडाल्याचे सांगितले.
यावेळी ज्योती यांनी लगेच पती काळू यांना फोन करून बोलावून घेतले. घराजवळील तळधाकडे दोघांनीही धाव घेतली असता मुले पाण्यात बुडाली होती. त्यावेळी काळू नवले यांनी पाण्यात उतरून मुलांना दोरीच्या सहाय्याने पाण्याबाहेर काढले. त्यावेळी श्रद्धा, सायली, तसेच दीपक व राधिका निपचित पडले होते. तातडीने काळू नयले यांनी संतोष गणपत हिंगे यांना फोन करून बोलावले, त्यावेळी त्यांच्या सोबत टेंगले व धनेश गवारीही होते. यावेळी संतोष हिंगे यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव येथील रुग्णवाहिका बोलावून घेतली आणि सर्वांना तातडीने मंचर येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी सर्वांना तपासून ते मयत झाल्याचे सांगितले.