लातूर (वृत्तसंस्था) उदगीर शहरालगत असलेल्या सोमनाथपूर परिसरातील एका खदानीत पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बिलाल युसूफ बागवान (२३, रा. मुसानगर, उदगीर) व अतिक शब्बीर बागवान (१९, रा. आर. के. नगर, उदगीर) अशी मयत युवकांची नावे आहेत.
मयत बिलाल बागवान आणि आतिक बागवान हे दोघं मावसभाऊ मंगळवारी (दि. १) दुपारी १२ वाजेच्या सुमारास सोमनाथपूर परिसरातील बी अँड सी क्वार्टरच्या पाठीमागील आरके नगर येथील खदानीमध्ये पोहायला गेले होते. बिलाल बागवान हा पोहोण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. तेव्हा त्याला वाचविण्यासाठी सोबत असलेला अतिक बागवान हा पाण्यात उतरला. परंतु दुर्दैवाने तो देखील पाण्यात बुडाला.
अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी या दोन्ही तरुणांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण पोलिसांनी उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दोन्ही मृतदेह दाखल केले. या घटनेप्रकरणी मोइज निजाम बागवान यांनी उदगीर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.