बुलढाणा (वृत्तसंस्था) मलकापूर तालुक्यातील विवरा येथील दोन तरुणांचा पूर्णा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना श्रीक्षेत्र धोपेश्वर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सागर मधूकर कडू (वय ३३) व नंदकिशोर समाधान धांडे (वय ३७), अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे विवरा गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील श्री क्षेत्र धोपेश्वर येथील पूजारी पूंजाजी महाराज गुरुवारी सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे स्नान करण्यासाठी गेले होते. त्यांना पूर्णेच्या काठावर दोन जणांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्या अनुषंगाने पोहेकॉ राजेश बावणे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. स्थळ पंचनामा करीत असताना नदीच्या काठावर दुचाकी (क्रमांक एमएच-२८-बीव्ही-३८१७) आढळून आली.
दोघांचे अंगावरील कपडेदेखील काढून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे दोघे पोहण्यासाठी पात्रात उतरले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी दोघांची ओळख पटविली असता सागर कडू व नंदकिशोर धांडे अशी मृतांची नावे असून, दोघेही तालुक्यातील विवरा येथील रहिवासी होते. दोघेही बुधवारी सायंकाळी ४ वाजेनंतर पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राजेश बावणे करीत आहेत.