एरंडोल (प्रतिनिधी) ट्रक आणि टाटा छोटाहत्तीच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झल्याची घटना बाणेगावजवळ घडली. यात सासू-जावयाचा समावेश असून यामुळे एरंडोल शहरावर शोककळा पसरली आहे.
या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, येथील पापड विक्रेते पापड विक्रीसाठी जात असताना त्यांच्या टाटा छोटाहत्ती गाडीला जालना जिल्ह्यातील बाणेगाव गावानजीक अपघात झाला असून दोन जण जागेवरच ठार तर एकाचा उपचारदारम्य मुत्यु झाला. एरंडोल येथील अमळनेर दरवाजा परिसरातील रामदास रतन पाटील (वय ४०), कल्पनाबाई भरत पाटील (वय ४७), कल्पना बाई गोविंदा ठाकूर (वय ४५) व सचिन पाटील, भारत पाटील हे एमएच १९ सीवाय १०९१ या क्रमांकाच्या टाटा एस या वाहनाने पापड व कुरडयांचा स्टॉक घेऊन विक्रीसाठी निघाले होते.
काल रात्र जास्त झाल्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवुन व त्याठिकाणी आराम करून ते पहाटे लवकर मार्गस्थ झाले. काही अंतर गेल्यावर त्यांच्या गाडीला वाणेगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कल्पनाबाई पाटील व रामदास पाटील हे सासू व जावई जागेवरच मृत्यूमुखी पडले. तर, कल्पना ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये चालकासह अजून दोन जण जखमी झाले असून सचिन सुखलाल पाटील (वय ४०) आणि भारत पाटील (वय ५५) यांच्यावर जालना येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी दादाराव बोर्डे, विकास जाधव, दत्ता राऊत, अनिल गवळी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची माहिती परिसरात मिळताच नातेवाईकांसह परिसरात शोककळा पसरली. याच परिसरातील बहुसंख्य महिला पापड तयार करतात व पुरुष मोठ्या शहरात मिळेल त्या वाहनाने जाऊन विक्री करतात. मात्र उदरनिर्वाहासाठी पापड विक्रीला निघालेल्या तिघांवर काळाने क्रूर झडप घाल्यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.