औरंगाबाद (वृत्तसंस्था) नैराश्यातून एका महिला आणि तिची गरोदर मुलगी या दोघींनी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या केलेल्या माय-लेकींनी त्यांच्या अडीच वर्षांच्या चिमुकलीलाही गळफास लावला मात्र सुदैवाने ही चिमुकली यात वाचली. माय-लेकींनी आत्महत्या केलेल्या ठिकाणी चार पानांची सुसाइड नोट (Suicide Note) मिळाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील पळशी इथली ही घटना आहे. कौटुंबिक नैराश्यातून माय-लेकीनं आत्महत्या केल्याचं सांगितले जातंय. ४७ वर्षीय आई सुनिता भारत साबळे आणि २७ वर्षीय मुलगी जागृती अनिल दांगोडे अशी आत्महत्या केलेल्या माय-लेकींचा नावं आहेत. तर दैव बलवत्तर म्हणून चिमुकली राजकन्या यातून वाचली. मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री नेहमी प्रमाणे माय-लेकी या अडीच वर्षांची चिमुकली राजकन्यासह घरात झोपले होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास चिमुकली घरातून रडत बाहेर आली. चिमुकली घराबाहेर रडत आली तेव्हा तिच्या गळ्यात दोरीचा फास होता. चिमुलीच्या गळ्यातील दोरीचा फास पाहून आणि तिला रडताना पाहून शेजारी राहणाऱ्या महिलेनं त्यांच्या घरात जाऊन पाहिलं. तेव्हा घरातलं दृश्या पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. घरात दोघीही माय-लेकीं गळफास घेतल्याचं भयंकर दृश्य दिसलं.
चार पानांची सुसाईड नोट सापडली
या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घरात तपासणी केल्यानंतर माय-लेकीने आत्महत्या केलेल्या ठिकाणी चार पानांची सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं की आम्ही चार जण म्हणजे माय-लेक, अडीच वर्षांची राजकन्या आणि पोटातील बाळ आत्महत्या करीत आहोत. मात्र सुदैवाने यात अडीच वर्षांची चिमुकली वाचली आहे.
या माय-लेकीने गळफास घेतला, तेव्हा चिमुकलीच्याही गळ्यात फास बांधला होता, माय-लेकींनी हातात दोरी धरुन राजकन्या या चिमुकलीला गळफास दिला. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या हातातून दोरी सुटली असावी आणि त्यामुळेच राजकन्या वाचली असा प्राथमिक अंदाज सुसाइड नोट आणि गळ्यात दोरीचा फास पाहून पोलिसांनी वर्तवला आहे. यातून अडीच वर्षांची चिमुकली वाचली असली तरी आता आजी-आईने आत्महत्या केल्याने चिमुकली राजकन्या ही पोरकी झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.