चंद्रपूर (वृत्तसंस्था) वीज गेल्यानंतर अनेकदा जनरेटचा वापर करण्यात येतो. मात्र, अशाच प्रकारे जनरेटरचा वापर हा नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. चंद्रपुरातील दुर्गापूर भागात जनरेटरच्या धुरात गुदमरुन ७ पैकी ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर भागात धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उजेडात आली आहे. रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून कुटुंबातील ७ पैकी ६ जणांचा मृत्यू झालाय. दुर्गापूर भागात वॉर्ड क्र. ३ मधील ही घटना असून मयत सर्व मजूर वर्गातील सदस्य आहेत. रात्री वीज गेल्यावर घरात या कुटूंबाने डिझेल जनरेटर संच लावला होता. या धुरामुळे त्यांचे श्वास गुदमरले. सकाळी शेजारच्या लोकांना शंका आल्यावर घटना उघडकीस आली. सर्व मयत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात आणले गेले आहेत.
मृतांची नावे
रमेश लष्करे- ४४, अजय लष्करे-२० लखन लष्करे ९, कृष्णा लष्करे ८, माधुरी लष्करे १८, पूजा लष्करे १४, या सर्वांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर दासू लष्करे ४० हा एकमेव सदस्य बचावला आहे. यांना रूग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.