जळगाव (विजय महाले) माजी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, पंजाबचे काँग्रेस प्रभारी आणि तब्बल पाच वेळा खासदार अशी प्रदीर्घ कारकिर्द असलेल्या हरीश रावत यांनी आता जरा थांबण्याचे सूतोवाच केले आहे. ते खरंच संन्यास घेणार की पंजाबमधील कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याप्रमाणे वेगळी चूल मांडणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी तसे केल्यास काँग्रेसच्या नुकसानापेक्षा त्यांना किती यश मिळणार, याची अधिक उत्सुकता आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि स्थानिक नेते नवज्योत सिद्धू यांच्यात अंतर्गत संघर्ष पेटलेला होता. तो तात्पुरता शमिवण्याची भूमिका हरीश रावत यांनी कौशल्याने बजावली होती. नंतर मात्र, हायकमांडच्या इशाऱ्यावरून मुख्यमंत्री बदलाच्या प्रक्रियेत कॅप्टन यांना दूर करीत चरणजितसिंग चन्नी यांना संधी देण्यातही रावत यांचा मतकौल मोलाचा ठरला होता. परंतु, या सर्व प्रक्रिया सुरू असताना त्यांना स्वत:ला उत्तराखंडमध्ये बाजुला सारण्याची खेळी कँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून केली जातेय, याचा त्यांनाच अंदाज आला नाही. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेस ढवळून काढण्यात सहभागी राहिलेले रावत उत्तराखंडमध्ये पक्षांतर्गत घडामोडींसाठी कारण ठरतील, याची बहुतेक त्यांना स्वत:ला सुद्धा कल्पना नसेल.
वयाची ७२ वर्षे पूर्ण केलल्या रावत यांची येत्या काही दिवसांत येऊन ठेपलेल्या उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून उतरण्याची इच्छा लपून राहिलेली नव्हती. यापूर्वी, २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देत रावत यांनी उत्तराखंडचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. अर्थात, या निवडीत त्यांच्या शांत, संयमी स्वभाव या गुणांपेक्षा तत्कालीन मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांचे २०१३ मधील महापूर हाताळणीतील अपयश अधिक कारणीभूत ठरले होते. या मिळालेल्या संधीतून २०१७ मध्ये ते उत्तराखंड काँग्रसकडे ठेवू शकतील, अशी अपेक्षा होती. मात्र, निम्मी अधिक काँग्रेस फुटून भाजपमध्ये सामील झाली. पक्षाच्या या पडझडीची जबाबदारी रावत यांना नाकारता आली नाही.
मध्यंतरी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षातून तयार झालेल्या २३ नेत्यांच्या गटापासून रावत यांनी स्वत:ला दूर ठेवले होते. पक्षातील नव्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा धोका न पत्करता आज्ञाधारता त्यांनी कायम दाखविली. यामुळे उत्तराखंड गमावल्यानंतरही त्यांना पंजाबसारख्या सत्ता असलेल्या राज्याचे प्रभारीपद मिळाले. उत्तराखंडमधील त्यांची लोकप्रियता प्रचंड आहे, अर्थात ती काँगेसमुळेच आहे. पण, त्यांच्या वाढत्या वयाचा विचार आणि राहुल गांधी यांना अपेक्षित टीममध्ये बसू शकत नसल्याने त्यांना दूर केल्याची शक्यता आहे. पक्षातून डावलले जात असल्याने त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ‘जे पेरले तेच उगवते’ या कोटीतून रावत यांच्यावर टीका केली आहे. अमरिंदरसिंग यांच्याप्रमाणे भाजपच्या पाठबळाने नव्या पक्षाचा नांगर हाती घेत ते उत्तराखंडमध्ये मशागत करणार की राजकीय संन्यास घेणार, हे येत्या काळात कळेलच.
विजय महाले
वरिष्ठ पत्रकार
99229 10743