चाळीसगाव ( प्रतिनिधी ): तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या २८ वर्षीय अनोळखी प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ११ जानेवारीला घडली होती. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चाळीसगाव रेल्वे पोलिसांनी तातडीने जखमी तरुणास प्रथम चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर धुळे शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मयत तरुणाचे वय अंदाजे २८ वर्षे, शरीर सडपातळ, रंग काळासावळा, चेहरा लांबट, नाक लांब, उंची अंदाजे साडेपाच फूट, उजव्या हाताच्या दंडावर हनुमानाचे चित्र गोंदलेले असून छातीच्या उजव्या बाजूस ‘मराठी माँ’ तसेच उजव्या हाताच्या मनगटावर ‘जयलक्ष्मी’ (मराठीत) व टी (इंग्रजीत) असे गोंदले आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा गोल गळ्याचा फुल टी-शर्ट व आकाशी रंगाची जीन्सची फुल पॅन्ट होती. या मृत तरुणाची ओळख पटवण्याचे आवाहन हवालदार नीलेश महाजन यांनी केले आहे.
















