जळगाव (प्रतिनिधी) कमल पॅरेडाईज येथे लग्न समारंभातून अज्ञात चोरट्यांनी नवरीचे सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे १६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, युवराज विश्वनाथ नेमाडे (वय-५३) रा. बाविसे गल्ली, रावेर यांच्या मुलीचे लग्न जळगाव- भुसावळ रोडवरील हॉटेल कमल परेडाईज येथे सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांचे नातेवाईकांसह आणि परिवारासह लग्नाला आलेले होते. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटे यात एक व्यक्ती आणि दोन लहान मुलांनी लग्न समारंभात व-हाडी व्यस्त असतांना पिशवीतून अडीच लाख रूपयांची रोकड, १ लाख रूपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची दोन चैन, ५५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी, ५५ हजार रूपये किंमतीची १ तोळ्याची सोन्याची चैन, ४ लाख रूपये किंमतीचा सोन्याचा हारसेट त्यात कानातील रिंगा, अंगठी, ब्रेसलेट, ४२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ लाख रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे झुमके, ४२ हजार रूपये किंमतीचा सोन्याची गॅम वजनाची बिंदी, ४२ हजार रूपये किंमतीची ८ ग्रॅम वजनाचे कानातील लोमटे, १ लाख १२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मोराचे पन्डल असलेले पैंडल असा एकुण १६ लाख १० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. युवराज नेमाडे यांनी तत्काळ सोमवारी सायंकाळी ८ वाजता शनीपेठ पोलीसात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी युवराज नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल कमल पॅरेटाईज हे सुसज्जित असे हॉटेल असून याठिकाणी लग्नाच्या हॉलमध्ये चोहीबाजूने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. दरम्यान, चोरटे हे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यात एक अनोळखी व्यक्ती आणि त्याच्यासोबत दोन लहान मुले असल्याचे दिसून येत आहे. तसेच हॉटेल कमल पॅरेटाईज येथील सीसीटीव्हीत कैद झालेल्या तीन जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.