नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आर्यन खान ड्रग्स प्रकरण एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने हाताळले, त्याची केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिशय गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अतिशय नाराज असल्याचे समजते. तसेच यातील महत्त्वाच्या माहितीबाबत एनसीबीच्या मुख्यालयालाही अंधारात ठेवल्याचे समोर आल्याचे सूत्रांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले आहे.
भाजपचे काही नेते एका तीनदिवसीय परिषदेसाठी दिल्लीत होते. त्यावेळी अमित शहा राज्यातील भाजपच्या काही नेत्यांशी चर्चाही केली. तसेच इतर सूत्रांकडूनही त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती घेतली. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणावर थेट भाष्य करणे टाळले आहे. तरीही आर्यन खान प्रकरणाचा तपास आणि हाताळण्याच्या पद्धतीमध्ये काही चुका समोर आल्या आहेत. तसेच नार्कोटीक्स ब्युरोचे महासंचालक सत्यनारायण प्रधान यांनाही तपासामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. प्रसारमाध्यमांमध्ये वानखेडे आणि या प्रकरणाबाबत काही गोष्टी झळकल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासामध्ये वानखेडे यांना मोकळीक देण्यात आली नाही.
आर्यनकडे ड्रस नसल्याबाबत मुख्यालय अंधारात
एका अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, नार्कोटीक्स ब्युरोच्या दैनंदिन कारभारामध्ये गृहमंत्रालय हस्तक्षेप करत नाही. मात्र, संपूर्ण संस्थेची प्रतिमा मलिन होणे आणि सरकारची बदनामी होईल, असे कृत्य करण्याची परवानगी एका अधिकाऱ्याला दिली जाऊ शकत नाही.
दरम्यान, विभागीय कार्यालयाने दिल्लीतील मुख्यालयाला संपूर्ण माहिती दिली नव्हती. आर्यनकडे ड्रग्स आढळले नव्हते, ही माहिती मुख्यालयाला दिलीच नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुख्यालयाचीही नाराजी आहे. त्यानंतर या मुख्यालयाला प्रत्येक तासाला माहिती देण्यात येत होती. हे प्रकरण संवेदनशील असल्याने ही माहिती गृहमंत्रालयालाही देण्यात आली.