नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी या लोकशाही राष्ट्राला या अतिशय महत्त्वाच्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. यामध्ये गुगल ही मागे राहिलेलं नाही. दरवर्षीप्रमाणं यंदाही भारताच्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत एक खास डूडल गुगलकडून साकारण्यात आलं आहे. देशभरात आज ७२ प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
गुगल डुडलच्या माध्यमातून भारतवासीयांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा गुगलकडून देण्यात आल्या आहेत. देशातील विविध सण आणि महत्वाच्या दिवशी गुगलकडून डुडलच्या माध्यमातून सेलिब्रेशन किंवा आदरांजली वाहिली जाते. यावेळीच्या डुडलमध्ये भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या होमपेजवर झळकणारं हे डुडल एका मुंबईकर तरुणानं तयार केलं आहे. ओंकार फोंडकर या तरुणानं गुगल डुडल तयार केलं असून त्यानं आपल्या कलाकृतीची दखल गुगलनं घेतली याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन गुगल डुडलच्या माध्यमातून घडविण्याची संधी मला मिळाली यासाठी मी अतिशय आनंदी आणि स्वत:ला भाग्यवान समजतो. भारताच्या विविधतेला एका कॅनव्हासवर रेखाटणं सोपी गोष्ट नाही. यात अनेक गोष्टी आहेत”, असं फोंडकर म्हणाला
जागतिक पटलावर भारताची जी ओळख आहे, त्याचाच आधार घेत हे डूडल साकारण्यात आलं आहे. विविधतेत एकता जपण्यासोबतच भारत हा एक संस्कृतीप्रधान देश आहे. गरीब असो वा श्रीमंत या देशात जातपात, भेदभाव न करता एकात्मतेच्याच तत्त्वावर चालत देशाभिमान जपण्याला इथं प्राधान्य दिलं जातं. अशाच या बहुरंगी राष्ट्राला गुगल या सर्च इंजिननं अनोख्या अंदाजात सलाम केलं आहे. गुगल सर्चमध्ये जाताच हे डूडल नजरेस पडतं. ज्यामध्ये पंजाबपासून ते अगदी केरळ, कर्नाटकापर्यंतच्या छटा पाहायला मिळतात. देशातील काही महत्त्वाच्या वास्तूंच्या पार्श्वभूमीवर कला आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणारा भारत, या डूडलमध्ये साकारण्यात आला आहे. शिक्षण आणि शिक्षकांचं महत्त्वं या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत कुटुंबवत्सलताही यामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.