जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा दुसऱ्या दिवशी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने सुरळीतपणे पार पडल्या. ऑनलाईन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण आज ८७ टक्के एवढे होते.
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा दि. १२ ऑक्टोबर पासून सुरू झाल्या. मंगळवारी परीक्षेचा दुसरा दिवस होता. आज विविध विद्याशाखांच्या १६२ विषयांची परीक्षा होती. सकाळच्या सत्रात ९ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा यशस्वीपणे दिली तर या सत्रात एक हजार विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली. ही आकडेवारी दुपारी साडे तीन वाजेपर्यंतची आहे.
सकाळी दहा वाजता परीक्षांना प्रारंभ झाला. काही विद्यार्थ्यांना लॉगइन होण्यासाठी अडचणी येत होत्या तर काही जणांना डॅश बोर्डवर पेपर दिसत नव्हता. हे तांत्रिक व्यत्यय तातडीने आय.टी. समन्वयकांच्या सहकार्याने सोडविण्यात आले. त्यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उभारण्यात आलेल्या वॉर रूम मधील प्राध्यापकांनी उत्तम सहकार्य केले. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहिला नाही अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी. पाटील यांनी दिली.
मंगळवारी सकाळी १० वाजता कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी नुतन मराठा महाविद्यालय व बाहेती महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. . यावेळी प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख व प्राचार्य डॉ. अनिल लोहार यांनी कुलगुरूंना माहिती दिली. या केंद्रांवर कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्हयातील परीक्षा केंद्रावर ऑफलाईन परीक्षा सुरळीत सुरु आहेत.
तीनही जिल्ह्यात जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहेत. ९२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तर १७ विद्यार्थ्यांनी ऑफलाईनचा पर्याय निवडला आहे. जळगावच्या एका विद्यार्थिनीने घरपोच पेपर दिला जावा अशी मागणी केल्यामुळे तीला दूताकरवी पेपर घरपोच दिला जात आहे. अशी माहिती दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर प्रा. दीपक सोनवणे यांनी दिली.
दरम्यान ऑनलाईन परीक्षा देतांना विद्यार्थ्यांनी शांतपणे परीक्षा द्यावी. कारण विंडो कालावधी तीन तासांचा असल्यामुळे तांत्रिक व्यत्यय आला तरी घाबरून जावू नये. Google Chrome / Mozilla Fire Fox ब्राउझर एक परीक्षा झाल्यानंतर Update करावे. तसेच त्या ब्राउझरमधील History Clear करावी म्हणजे चालू स्थितीत बंद पडणार नाही. तांत्रिक व्यत्यय दूर होत नसेल तर संबंधित महाविद्यालयातील आय.टी. समन्वयकाशी संपर्क साधावा. असे आवाहन ऑनलाईन परीक्षा समन्वयक प्रा. किशोर पवार यांनी केले आहे.
सायंकाळी उशीरापर्यंत ऑनलाईन परीक्षा सुरु होती. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा. बी.व्ही. पवार हे सातत्याने या परीक्षेचा आढावा घेवून योग्य त्या सूचना संबंधितांना करीत होते. सर्व अधिष्ठाता देखील या परीक्षांसाठी सहकार्य करीत आहेत. विद्यापीठाने नियुक्त केलेल्या देखरेख समितीच्या सदस्यांनी मंगळवारी देखील विविध महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.