धरणगाव (प्रतिनिधी) किमान वेतन कायदा व कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यापीठाविरुद्ध धरणगाव न्यायालयात खटला सुरू आहे. याच प्रकरणात प्रभारी कुलसचिव आर.एल. शिंदे यांना हजर राहण्याचे आदेश धरणगाव न्यायालयाने गुरुवारी दिले आहेत.
किमान वेतन कायदा व कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव व तत्कालीन आस्थापना प्रमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, खुलासा सादर न केल्यामुळे अखेर त्यांच्याविरुद्ध सहायक कामगार आयुक्त यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हा खटला न्यायालयात सुरू झालाय.
दरम्यान, न्यायालयाने प्रभारी कुलसचिव आर.एल. शिंदे यांना न्यायालयात हजर होण्याचे सांगितले होते. नंतर कुलगुरू यांनीही त्यांना न्यायालयात हजर होण्याचे पत्र काढले होते. मात्र, ते हजर न झाल्यामुळे अखेर गुरुवारी धरणगाव न्यायालयाने प्रभारी कुलसचिव यांना न्यायालयात हजर व्हावे व त्यांना एक हजार रुपयांच्या जामिनावर वॉरंट बजाविण्याचे आदेश दिले आहेत.