जळगाव (प्रतिनिधी) कोविडच्या आपत्तीमुळे ठिकठिकाणच्या स्मशानभूमित लाकडांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असतांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात पडून असणारा लाकडांचा साठा पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या गावांना मिळावा अशी मागणी केली होती. यानुसार या दोन्ही गावांना लाकडांचा साठा सुपुर्द करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात खूप मोठ्या प्रमाणात वृक्षराजी असून यातील कोरडे झालेली लाकडे जमा करण्यात येतात. आजवर विद्यापीठाकडे ३०० टनांपेक्षा जास्त सुकलेली लाकडे जमा झालेली आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून हा लाकूडसाठा पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक व बांभोरी प्र. चा. या गावांना देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. या मागणीला अनुसरून आज दोन्ही गावांना लाकडांचा साठा सुपुर्द करण्यात आला आहे. तत्पूर्वी अलीकडेच जळगाव महापालिकेला यातील मोठा साठा देण्यात आला आहे. यानंतर धरणगाव नगरपालिकेलाही लाकडे देण्यात आली आहेत. यानंतर आज पाळधी खुर्द, बांभोरी प्र. चा. व पाळधी बुद्रुक या ग्रामपंचायतींना विद्यापीठ प्रशासनाने लाकूडसाठा प्रदान केला आहे. यामुळे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई. वायूनंदन यांच्यासह प्रशासनाचे आभार मानले आहेत.
याप्रसंगी प्र कुलगुरू बी. व्ही. पवार, प्र. कुलसचिव एस. आर. भादलीकर व माजी महापौर विष्णू भंगाळे यांची उपस्थिती होती.