नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान कांचीपूरम भागात अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हासन यांच्या गाडीवर एका व्यक्तीनं हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडल्याचं समजतंय. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. मात्र यावेळी हासन यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
कमल हासन यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती त्यांचा फॅन असल्याचं म्हणत आहे. तसेच त्यानं ज्यावेळी हल्ला केला तेव्हा तो नशेत होता. हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. मौर्य यांनी ट्वीट करत कमल हासन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी नशेत असलेल्या आरोपीला बेदम मारहाण केली आहे. यानंतर पोलिसांनी जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत मक्कल निधी मय्यम पक्षानं १५४ मतदारसंघांतून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. खुद्द कमल हासन कोयम्बतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांवर एकाच दिवशी म्हणजेच ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल इतर राज्यांसोबत अर्थात २ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्यात सत्ताधारी एआयएडीएमके भाजप आणि पीएके सोबत आघाडीत आहे.
प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांनी देखील कोरोनाची लस घेतली. तसेच इतरांना देखील लस घेण्याचं आवाहन केलं आहे. “पुढच्या महिन्यात भ्रष्टाचाराचं लसीकरण करुया” असं म्हणत कोरोनाची लस घेताना कमल हासन यांनी सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे.