जळगाव( प्रतिनिधी ) – जिल्हयात आज अवकाळी पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्याने या वादळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, गहु आडवा झाला असुन रावेर तालुक्यातील खानापुर पट्टा परिसरासह धरणगाव तालुक्यातील चांदसर, धार परिसरात व अनेक भागात गारपिट देखील झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात बदल, ढगाळ वातावरण होते. आज अचानक सायंकाळी जिल्ह्यात बहुतंश तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली. त्यातच रावेर तालुक्यात गारपिट झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
ठिकठिकाणी वृक्ष कोलमडल्याने वाहतुक खोळवंली होती.
गहु, मकाचे मोठे नुकसान
जिल्हयात अवकाळी पावसामुळे व वादळामुळे मका, गहु आडवा झाला आहे. गहु व मका जमिनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कापणीवर आलेल्या पिकांवर निसर्गाचा प्रहार झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
जळगाव झाले जलयम
जळगाव शहरात देखील सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पथविक्रेत्यांचे नुकसान झाले. टॉवर चौक ते महापालिका दरम्यान तर रस्ता पुर्ण जलमय झाला होता. रस्त्यावर २ ते अडीच फुट पाणी साचले होते. तसेच बजरंग बोगदा देखील पाण्याने तुडूंब भरला होता. उपनगरांमध्ये
वृक्ष कोलमडल्याने तीन ते चार तास विजपुरवठा खंडीत झाला होता.
दोन दिवस पावसाळीवातावरण
जिल्हयात दोन दिवसापासुन ढगाळ वातावरण झाले होते. त्यात आज सायंकाळी तब्बल पाऊन तास पावसाने जोरदार हजेरी लावली. येत्या दोन दिवसात देखील पावसाचा अंदाज असुन ढगाळ वातावरण कायम राहील. काही ठिकाणी हलका, जोरदार पाऊस होण्याची शक्यता असुन थंडीचा जोर वाढण्यापेक्षा वातावरणात दमटपणा वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
















