नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री जिल्ह्यात असतांना तर केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात येण्याच्या पूर्वसंध्येला वाळू माफिया सुसाट झाले असल्याचे चित्र नांदेड गावात दिसून येत आहे. कारण शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली वाळू माफिया अवैधरित्या रात्रीतून बेसुमार उपसा करत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे युवा सेनेचे उप तालुकाध्यक्ष भरत सैंदाणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांना फोनवरून पुराव्यासह तक्रारी केल्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सायंकाळनंतरही वाळू उपसा सुरूच !
शिंदे गटाचे युवा सेनेचे उप तालुकाध्यक्ष भरत सैंदाणे यांनी म्हटले आहे की, धरणगावला शासकीय वाळू डेपो नुकताच सुरु झाला आहे. परंतू वाळू माफिया सुसाट झाले असून नदीतून भरलेले वाळूचे डंपर डेपोत न नेता सरळ विक्री करण्यात येत आहेत. याबद्दल सर्व माहिती प्रशासनाला दिली आहे. परंतू कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. तसेच वाळू वाहतुकीचा नियम सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत असताना चक्क सात वाजेनंतरही वाळू वाहतूक सुरू असते. तरी याकडे प्रशासनाने व्यवस्थित लक्ष घालून नदीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. शासकीय वाळू डेपो शी संबंधित कामासाठी प्रामाणिक अधिकारी नेमले गेले पाहिजेत. अन्यथा सरकारी डेपोच्या नावावर अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होणाची शक्यता आहे.
खोटे गुन्हे दाखल करण्याच्या ग्रामस्थांना धमक्या !
गावातील काही तरुण वाळू वाहतूक नियमात होण्यासाठी जिओ टॅगचे वाहनांच्या फोटो काढत असताना काही वाळू माफिया तसेच ठेकेदारांची माणसे गावकऱ्यांना सरकारी कामात अडथळा आणत म्हणून तुमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू आणि जेलमध्ये टाकू. तुम्हा कोणत्याही अन्य गुन्ह्यातही फसवून देऊ, अशा धमक्या दिल्याचा खळबळजनक आरोपही सैंदाणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री जिल्ह्यात तर केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात येण्याच्या पूर्वसंध्येलाही वाळू माफिया सुसाटच !
प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नदी व शेतकऱ्यांची जमीन आणि नांदेड गावातून होणाऱ्या पाच-सहा गावांचा पाणी टंचाई लक्षात घेता भविष्यात अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही भरत सैंदाणे यांनी प्रशासनाला केली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे जिल्ह्यात होते तर उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिल्ह्यात येणार आहेत, तरी देखील वाळू माफिया सुसाट असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.