धरणगाव (प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण (Vaccination) करण्यात येत आहे. परंतू लसीकरण वेगाने होण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत लसीकरण सुरु करण्याची मागणी कॉंग्रेसचे युवा नेते चंदन पाटील यांनी केली आहे.
शहरातील १५ ते १८ वयोगटामधील मुलांना व युवकांना कोविड प्रतिबंधनात्मक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. सदर वयोगटातील सर्व विद्यार्थी व युवकांनी केंद्रावर जाऊन लसी घेत आहेत. परंतू कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, हे लसीकरण शाळा-महाविद्यालयांत सुरु केले तर लसीकरणाचा वेग वाढेल. त्यामुळे प्रशासनाने शहरासह तालुक्यातील शाळा-महाविद्यालयांत लसीकरण सुरु करण्याची मागणी कॉंग्रेसचे युवा नेते चंदन पाटील यांनी केली आहे. तसेच शहरातील दहावी, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा (School) व महाविद्यालयांमध्ये (College) लसीकरण करून देण्याची व्यवस्था नगरपालिका तसेच आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी देखील श्री. पाटील यांनी केली आहे. कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी शहरासह तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केल्यास कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यात मदत होईल. दरम्यान, करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यासह देशभरात पुन्हा काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन देखील चंदन पाटील यांनी केले आहे.