धरणगाव (प्रतिनिधी) भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक, अध्यक्ष वामन मेश्राम व सहकारी यांच्या माध्यमातून ईव्हीएमचा भंडाफोड करणारी देशव्यापी परिवर्तन प्रवास (यात्रा भाग २) काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निघाली आहे. शुक्रवार रोजी धुळे जिल्ह्यातून निघालेली परीवर्तन यात्रा धरणगाव शहरात पोहोचल्यानंतर वामन मेश्राम यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धरणगाव नगरीचे नगराध्यक्ष निलेश चौधरी, भारत मुक्ती मोर्चा प्रदेश सचिव मोहन शिंदे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुकाध्यक्ष निलेश पवार, व्याख्याते ॲड.रविंद्र गजरे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा नगर मोमीन, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, नगरसेवक भीमराव धनगर, भागवत चौधरी, मयूर भामरे, गोपाल माळी, गोपाल पाटील, गणेश महाजन, नदीम काझी, सिराजभाई, अलाउद्दिन खाटीक, भरत मराठे, सुनील लोहार, आदी कार्यकर्त्यांनी अमळनेर रस्त्यावर पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
तद्नंतर मेश्राम साहेब यांना घोडा (बग्गी) रथावर बसवून रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी, ओबीसी (पिछडा) मोर्चा प्रदेश सदस्य राजेंद्र वाघ ( माळी ) यांनी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचे पागोटे वामन मेश्राम साहेब यांच्या डोक्यावर घालून स्वागत केले. रॅली झेंडा चौकात आल्यानंतर छ.शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी झेंडा चौकात छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे प्रास्तविक ॲड.गजरे यांनी केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सभेला संबोधित करताना म्हणाले की, ईव्हीएम ज्या प्रगत देशात तयार केले जाते, त्याच देशात ईव्हीएम मशीन नाकारली जाते आणि मतप्रक्रिया ही बॅलेट पेपरवर घेतली जाते. म्हणूनच ज्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त होते तो विजयी होतो आणि विजयी होणाऱ्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागतो.
निवडणूक आयोगाने ईव्हीएमद्वारे मतप्रक्रिया न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात. त्याचप्रमाणे मेश्राम साहेब व कार्यकर्त्यांचे कार्य सर्व सामान्यांसाठीचे असल्याने श्री.वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर वामन मेश्राम यांनी राजकीय क्षेत्रात कार्य करणारे बुद्धिजीवी व राजनीतिक नेत्यांना ईव्हीएम मशीनच्या गडबड घोटाळ्यांची माहिती आहे व ईव्हीएम संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती देशातील सर्वसामान्य असलेली बोली जनतेला माहिती नाही. ईव्हीएम च्या माध्यमातून लोकशाहीची हत्या सुरू आहे. मोठ्या प्रमाणात खाजगीकरण केले जात आहे. सरकारी उद्योग कवडीमोल भावात उद्योगपतींना विकले जात आहेत. त्याचप्रमाणे लागेबांधे असणाऱ्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देण्यात आली.
खाजगीकरणामुळे आरक्षण शून्य झाले सर्व सामान्यांचे रोजगार संपला. शासकीय कर्मचाऱ्यांच्या फायद्यात असणारी जुनी पेन्शन व सामाजिक योजना देखील बंद करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्राकडून कोणतेही हालचाली केले जात नाही. स्वातंत्र्याचे ७५ वर्षानंतर सुद्धा ओबीसींची निश्चित संख्या नसल्याचे कारण सांगून जनगणना होत नाही. ओबीसींसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही व ओबीसींना हक्क अधिकाऱ्यांपासून सुद्धा वंचित ठेवण्याचे कार्य केंद्राकडून केले जात आहे.
ईव्हिएम व विविध समस्याबाबत वामन मेश्राम यांनी राष्ट्रीय परिवर्तन ईव्हीएम भांडाफोड यात्रेच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले केले. यावेळी विचार मंचावर शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, बामसेफचे वरिष्ठ पदाधिकारी सुमित्र अहिरे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, भारत मुक्ती मोर्चाचे मोहन शिंदे, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र वाघ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. उध्दव ढमाळे यांच्या नेतृत्वात पोलिस प्रशासनाने अनमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर मोमीन तर आभार निलेश पवार यांनी मानले.