कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील जीवन प्राधिकरण अंतर्गत असलेल्या आडगावसह १६ गाव योजना प्रलंबित विद्युत् बिलामुळे बंद पडली आहे. त्यामुळे वन कोठे बांबोरी गावासह उपनगरातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कोरोना काळात महावितरणने १६ गाव योजनेचा पाणी पुरवठा सुरू ठेवला. त्या काळात विद्युत बिलाचा आकडा वाढत गेला. ग्रामपंचायतीने तो विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे परिणामी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला.
या योजनेत कासोदा वनकुटे बांबोरी तळई समाविष्ट आहेत. सध्यास्थितीत वनकुटे बांबोरीला पर्यायी योजनेतून उशिरा का असेना पाणीपुरवठा होतो. मात्र कासोदा गावाला जोडून असलेल्या शिवाजीनगर, पांडे नगर, अर्जुन नगर, श्री कृष्णा नगर, गोपाल नगर, मार्केट यार्ड या विभागांना बोअरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. मात्र, त्या बोरला पुरेसे पाणी नाही. त्यावर दिवसभरातून दोन भाग होतात. परिणामी ८ ते १० दिवसात फक्त २० मिनिटे पाणीपुरवठा होतो, तोही कमी दाबाचा असून आणि क्षारयुक्त असतो. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे .सध्या कडक ऊन, लग्न, पाहुण्यांची वर्दळ या सर्व गोष्टी त्रासदायक ठरत आहेत. १६ गाव योजनेत पाणी असून लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एखाद्या दिवशी याचा अतिरेक झाल्यास, उद्रेक झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर येतील. त्याआधी ग्रामपंचायतीने व्यवस्था करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे.
या पाण्याची समस्या संदर्भात वनकुठ्याचे लोकनियुक्त सरपंच उमेश छावा यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, १६ गावची योजना बंद असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. ही समस्या दूर व्हावी म्हणून आ. चिमणराव पाटील यांच्याशी संपर्क साधून ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार चिमणराव पाटील यांनी या कामाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांच्या सहकार्यानेच १६ गाव पाणीपुरवठा योजना उद्या दि. १० मार्च रोजी पासून सुरळीत होईल व या कामी कासोदा सरपंच महेश बापु पांडे रवींद्र चौधरी, गुरु भाऊ सोनवणे यांनी सहकार्य केले. लोकनियुक्त सरपंच उमेश छावा यांनी आमदार चिमणराव पाटील, महेश बापू पांडे, रवींद्र चौधरी, गुरु भाऊ सोनवणे यांनी सहकार्य केल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच उमेश छावा यांनी आभार मानले व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे कर भरून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.