वरणगाव ता. भुसावळ (प्रतिनिधी) पुरातील पाण्याचा अंदाज न आल्याने लवकी नाल्यात बुडाल्याने वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील कर्मचार्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजता घडी. शुभम बबलू तायडे (23, आनंद नगर, भुसावळ) असे मयत कर्मचार्याचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शुभम बबलू तायडे हा फॅक्टरीमध्ये दरबान पदावर नोकरीवर असून तो आनंद नगर भुसावळ मध्ये राहतो. सकाळी सात वाजता तो ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाला. लवकीच्या नाल्याला पूर असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो पडला असावा असा पोलिसांचा कयास आहे. वरणगाव येथील मयूर जावळे याचा दूरध्वनीद्वारे इंटकचे महासचिव महेश पाटील यांना कळवले की, लवकी नाल्यात फॅक्टरीचे स्टिकर लावलेली मोटरसायकल क्रमांक (एमएच १९डी आर ४०४६) पडलेली आहे. त्यावेळी महेश पाटील यांनी समक्ष जाऊन बघितले असता सदरची मोटरसायकल ही शुभम तायडेची असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नाल्याच्या किनाऱ्यावर १०० मीटर अंतरावर शोध घेतल्यानंतर शुभम तायडे हा झाड झुडपांमध्ये मयत अवस्थेत आढळून आला. यावेळी महेश पाटील यांनी वरणगांव पोलीस स्टेशनला खबर दिली. अधिक तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ करीत आहे.