जळगाव (प्रतिनिधी) जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगांवकरांना २४ तास पाणी मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात भाजपच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सुनील काळे यांनी प्रयत्न करून पाणी पुरवठा योजना तत्कालीन जलसंपदा मंत्री आमदार गिरिष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून वरणगांव शहरासाठी २५ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेला स्थगिती देण्यात आली. यामुळे सरकारच्या विरोधात सुनिल काळे कोर्टात गेले होते, दरम्यान कोर्टाने स्थगिती उठवली, परंतु पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप ही सुरू न झाल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने वरणगावात उपोषण करण्यात आहे. दरम्यान पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात आली नाही, तर जल समाधी आंदोलना करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.