जळगाव (प्रतिनिधी) भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील विविध विभागांनी जिल्हाभरात नाविण्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्या.
अमृत महोत्सवी भारत उपक्रमाचे आयोजनाबाबत आज जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक विवेक होशिंग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालाचे अधिष्ठाता डॉ फुलपाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती मीनल कुटे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, तहसीलदार सुरेश थोरात आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगसट, २०२२ पर्यंत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहेत. यात ७५ आठवड्यात ७५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी याबाबत आवश्यक ते नियोजन आतापासूनच करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राऊत यांनी यावेळी दिल्यात. यात सायकल रॅली, हेरिटेज वॉक, धावण्याच्या स्पर्धा, लोककलेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती, बालनाट्य महोतसव,निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला आयोजित करणे, आकाशवाणीवरुन जिल्ह्यातील स्वातंत्र चळवळीशी संबंधित स्वातंत्र्य सैनिक, घटना, स्थळे यांची माहिती देणे, वृक्ष लागवड करणे, जिल्ह्यातील ७५ गावांमध्ये अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, श्रमदान शिबिर, रक्तदान शिबिर, स्वातंत्र्य सेनानी यांचा सत्कार करणे, ऐतिहासिक स्थळांच्या नामफलकाचे अनावरण करणे, बचतगटांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, मान्यवरांकडून स्वातंत्र चळवळीवर लेख लिहून त्यांची विविध प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्दी करणे, मान्यवरांच्या आकाशवाणीवर मुलाखती घेणे आदि उपक्रम राबविण्याचे नियोजन असून त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच त्याचे नियोजन करण्याच्या सुचना या बैठकीत देण्यात आल्या असून संबंधित विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार विभागांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीनुसार कार्यक्रम घेण्याच्या सुचनाही राऊत यांनी या बैठकीत दिल्यात.