पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या बोधगया येथील महाबोधी मंदिर परिसरात जमिनीखाली विशाल संरचना असल्याचे पुरावे उपग्रह छायाचित्र आणि भौगोलिक सर्वेक्षणांमधून मिळाले आहेत. ही वास्तुसंपदा जगासमोर आणण्यासाठी उत्खननाची गरज पडणार आहे.
भगवान गौतम बुद्धांशी संबंधित महाबोधी मंदिर परिसर हे युनेस्कोच्या यादीतील जागतिक वारसा स्थळ आहे. या परिसरातील बोधी वृक्षाखाली तथागतांना ज्ञानप्राप्ती झाल्याचे मानले जाते. या ऐतिहासिक परिसरातील अज्ञात बाबींचा उलगडा करण्यासाठी बिहार सरकारच्या कला, संस्कृती व युवा विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बिहार हेरिटेज डेव्हलपमेंट सोसायटीने ब्रिटनच्या कार्डिफ विद्यापीठाच्या मदतीने यासंदर्भातील अभ्यास केला आहे. भौगोलिक विश्लेषणासाठी उपग्रह छायाचित्रांचा वापर करण्यात आला.
सोबतच प्रत्यक्षात जमिनीवरून देखील सर्वेक्षण करण्यात आले. या अभ्यासात महाबोधी मंदिर परिसरात जमिनीखाली संरचना असल्याचे पुरावे मिळाल्याचे कला, संस्कृती, युवा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हरजौत कौर बह्मराह यांनी सांगितले. मंदिर परिसरात जमिनीखाली विशाल वास्तुसंपदा आहे. हा ऐतिहासिक ठेवा जगासमोर उलगडण्यासाठी याठिकाणी उत्खनन करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. सातव्या शतकात भारत भ्रमंतीवर आलेला चिनी प्रवासी झुआनसँग याच्या प्रवास वर्णनावरून हा अभ्यास हाती घेण्यात आला आहे.
महाबोधी मंदिर परिसरात ५० मीटर उंचीचे मुख्य मंदिर, पवित्र बोधी वृक्ष आणि गौतम बुद्धांशी संबंधित अजून सहा पवित्र ठिकाणे आहेत. याशिवाय ऐतिहासिक स्तूप आहेत. मंदिराजवळून निरंजन नदी वाहते. या नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर महाबोधी मंदिर आहे. तर सुजाता स्तूप आणि इतर पुरातन वास्तू नदीच्या पूर्वकिनाऱ्यावर आहेत. नदीच्या पूर्वेकडील पुरातत्व अवशेष महाबोधी मंदिरापासून स्वतंत्र मानले जातात; परंतु ताज्या संशोधनानुसार सुजाता स्तूप व महाबोधी मंदिर आधी नदीच्या एकाच किनाऱ्यावर होते, असे बह्मराह यांनी सांगितले.