जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात उशिरा जन्म दाखल्यांची नोंद करण्यासाठी आलेल्या ५० आदेशांवरील तहसीलदारांच्या सह्या व आवक जावक क्रमांक संशयास्पद आढळून आल्याने मनपाने ते आदेश तहसीलदारांना पडताळणीसाठी पाठविले आहेत. या आदेशांची पडताळणी गेल्या तीन दिवसांपासून सुरु असून त्यात बनावट सह्या व बोगस आवक जावक क्रमांक आढळून आल्यास असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागात उशिरा जन्म दाखल्यांची नोंद करण्यासाठी तहसील कार्यालयाकडून ५० आदेश प्राप्त झाले आहेत. हे सर्व आदेश एकाच व्यक्तीकडून दाखल करण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना जन्म दाखल्याची नोंद करावयाची आहे. ते व्यक्ती प्रत्यक्ष त्या ठिकाणी आलेले नाही, त्यामुळे सदर आदेश हे बनावट तर नाही ना? असा प्रश्न मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्यांना पडला. तसेच आदेशांवरील सह्या व आवक जावक क्रमांक बघितले असता ते देखील संशयास्पद आढळून आल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले आणि वरिष्ठांनी यासंदर्भात चर्चा करून तहसीलदारांच्या आदेशावरील सह्या व आवक जावक क्रमांक यांची तपासणी करण्यासाठी तहसीलदारांना पत्र पाठवून ५० जणांची यादी पाठवली आहे. मनपाच्या पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार शीतल राजपूत यांच्या टीमकडून पडताळणीचे काम सुरु आहे. या पडताळणीत आदेशावरील सह्या व आवक जावक क्रमांक बनावट आढळून आल्यास हे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.