जळगाव (प्रतिनिधी) ‘तुम्हाला मोफत धान्य मिळतेय ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे मिळत आहे. त्यामुळे दि. २७ रोजी पोलीस कवायत मैदानावर होत असलेल्या सभेला हजर रहा, अन्यथा धान्य, कार्ड बंद झाल्यास आम्ही जबाबदार नाही, अशा आशयाचे मॅसेज जळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांकडून सर्व रेशनकार्डधारकांना पाठवण्यात आले आहेत. यावरून गर्दी जमवण्यासाठी प्रशासन रेशनकार्ड धारकांना धमकावत असल्याचा आरोप विरोधक करताय.
जाणून घ्या…मॅसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय ?
अत्यंत महत्वाचे सर्व ग्राहकांना सुचित करण्यात येते की आपल्याला मोफत धान्य मिळत आहे हे ज्यांच्या प्रयत्नांनी मिळत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तथा जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, तहसीलदार व पदाधिकारी यांची २७/६/२०२३ मंगळवार रोजी दुपारी ३.०० वाजता पोलीस मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे. कृपया सभेची सर्वांनी जबाबदारीने नोंद घ्यावी अन्यथा धान्य बंद झाल्यास व कार्ड बंद झाल्यास आम्ही व मी जबाबदार राहणार नाही. तर जिल्ह्यातील काही भागात सभेला येणे सर्व रेशनकार्डधारकांना बंधनकारक आहे. जे हजर राहणार नाहीत त्यांचे रेशनकार्ड रद्द करून धान्यही पुढच्या तीन ते चार महिन्यांसाठी बंद करण्यात येईल, असा सरकारचा नियम असल्याचेही म्हटले आहे.
लाभार्थींनी सभेला यावे, अशी अपेक्षा पण सक्ती नाही : जिल्हाधिकारी अमन मित्तल !
‘लाभार्थींनी सभेला यावे, अशी अपेक्षा आहे, पण कोणावरही सक्ती नाही. असे संदेश पाठवायला कुणीही सांगितले नाही. धान्य बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. जे दुकानदार अशा धमक्या देतील त्यांचे परवाने रद्द करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलतांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली आहे.