नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज मिताली राजने शुक्रवारी इतिहास घडवला. ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली तर जगातील फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत हा विक्रम केला.
भारतीय पुरुष क्रिकेटपटूंनी नुकतीच इंग्लंडला कसोटी मालिकेमध्ये ३-१ अशी धूळ चारत भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंदित केलेलं असताना भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं भारतीयांचा हा आनंद द्विगुणित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला एकदिवसीय मालिका सुरू असून त्यात मितालीनं हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिनं हा मैलाचा दगड पार करताच BCCI नं ट्वीट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीनं आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत ३१० सामने खेळले आहेत. त्यापैकी १० कसोटी सामने, २११ एकदिवसीय सामने तर तब्बल ८२ टी २० सामन्यांचा समावेश आहे. १९९९मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास २२ वर्षांहून अधिक काळ मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.