जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नियमांचे उल्लंघन करून बैठक घेतल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांविरुद्ध रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत १५ मे रोजी दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अजिंठा विश्रामगृह येथे विनापरवानगी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या बैठकीला रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील, काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, श्याम तायडे यांच्यासह अन्य २० ते २५ जणांची उपस्थिती होती. कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांच्या गर्दीत बैठक घेतल्याने आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक हर्षल पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस स्थानकात सोमवारी रात्री उशीरा भादवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉस्टेबल सुनिल पाटील करीत आहे.